मासिक भविष्य जूलै २०१९ | Monthly Horoscope July 2019

मासिक भविष्य जूलै २०१९ | Monthly Horoscope July 2019


मेष : हा महिना आपल्यासाठी खूपच चांगला आहे. साहित्य, लेखन व संगीत ह्याची गोडी लागेल. आपली भाग्यवृद्धी होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आपल्या कष्टाच्या जोरावर आपण विरोधकांवर मात करू शकाल. आपण सुग्रास भोजन व नवीन वस्त्र खरेदी ह्यावर खर्च करू शकाल. आपणास उत्तम धनप्राप्ती होईल, मात्र खर्चावर नियंत्रण न राहिल्याने आपले मन खिन्न होईल. ह्या महिन्यात निष्कारण एखाद्या वादात न पडणे आपल्यासाठी हितावह होईल. हा महिना विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. अभ्यासात त्यांचे लक्ष लागेल. आपणास स्त्री मित्रांकडून लाभ प्राप्ती होण्याची शक्यता आहे. मात्र, रागावर नियंत्रण न ठेवणे आपल्यासाठी नुकसानदायी होऊ शकेल. ह्या महिन्यात आपले आरोग्य एकंदरीत उत्तम राहील.


ऋषभ : हा महिना आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. मात्र, महिन्याच्या दुसऱ्या पर्वात स्थितीत बदल नक्कीच होईल. ह्या महिन्यात आपण आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न कराल. स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा कराल. मात्र, एवढी धावपळ करून सुद्धा आर्थिक स्थिती मजबूत होणार नाही. महिन्याच्या दुसऱ्या पर्वात मात्र ह्यात थोडी सुधारणा होईल. नोकरी करणाऱ्यांना थोडा आराम वाटेल. आपणास अतिसंवेदनशील न होता कर्मशील होण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या महिन्यात आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. ह्या महिन्यात संततीशी काही वैचारिक मतभेद होतील. आपणास बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. ह्या महिन्यात एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीच्या आजारपणामुळे आपण चिंतीत व्हाल, मात्र महिन्याच्या दुसऱ्या पर्वात स्थितीत सुधारणा होईल. कुटुंबीय आपल्या म्हणण्यास महत्व देतील. आपणास कुटुंबियांचे सहकार्य मिळेल व आपली काळजी सुद्धा दूर होईल. सकारात्मक विचारांमुळे आपण आपले वेगळे स्थान निर्माण कराल. महिन्याच्या सुरवातीस आरोग्य विषयक काही त्रास जाणवेल, मात्र त्यात हळू हळू सुधारणा होईल.


मिथुन : ह्या महिन्यात आपण जर सावध राहिलात तर हा महिना आपल्यासाठी उत्तम फलदायी ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तमच आहे. वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. सरकारी कामात सुद्धा यश प्राप्तीची शक्यता आहे. एखाद्या चांगल्या ठिकाणी केलेली गुंतवणूक सुद्धा फायदेशीर ठरेल. कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी कंजूषपणा न करता आपण खर्च करावा. ह्या महिन्यात आपणास आपला हट्टीपणा सोडावा लागेल, अन्यथा आपले एखादे नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. ह्या महिन्यात आपणास आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. अन्यथा संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. आपणास संतती संबंधित एखादी काळजी सुद्धा वाटू लागेल. एकंदरीत कौटुंबिक वातावरण सुखदायी राहील. आपण मित्रांसह सुद्धा वेळ घालवू शकाल. आपल्या प्रिय व्यक्तीसह बाहेर रात्री भोजनास जाण्याचा आनंद घेऊ शकाल. ह्या महिन्यात आपली प्रकृती नरम - गरमच राहील. आपणास प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.


कर्क : हा महिना आपल्यासाठी अंशतः चांगला आहे. सामाजिक कामात आपली गोडी वाढेल. ह्या महिन्यात आपण एखादे साहस कराल. नोकरी - व्यवसायात लाभ होईल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. नोकरीत पदोन्नतीसाठी वरिष्ठ आपले नांव सुचवू शकतील. एखादे जुने किंवा खोळंबलेले काम पूर्णत्वास गेल्याने आपण खुश व्हाल. ह्या महिन्यात आपण एखादी मोठी खरेदी करू शकाल. शेअर्स बाजारातून सुद्धा आपणास लाभ होण्याची शक्यता आहे. हा महिना विद्यार्थ्यांसाठी चांगला असला तरी सुद्धा त्यांना अधिक मेहनत करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या महिन्यात आपण कुटुंबियांसह एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी होऊ शकाल. वैवाहिक जीवन सुद्धा सुखद होईल. वैवाहिक जोडीदाराच्या सहकार्याने आपण एखादे चांगले काम करू शकाल. आपल्या माणसांचा सहवास घडेल व त्यामुळे मन प्रसन्न होईल. मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. मात्र, स्त्रीवर्गास काहीशी बेचैनी जाणवेल. ह्या महिन्यात आपले आरोग्य उत्तम राहील.


सिंह : हा महिना नोकरी व व्यापार करणाऱ्यांसाठी विशेष असा आहे. ह्या महिन्यात कुटुंबापेक्षा अधिक वेळ आपण व्यावसायिक कामात व्यस्त राहाल. नोकरी करणाऱ्यांना नवीन उद्दिष्टे मिळतील. महिन्याच्या दुसऱ्या पर्वात वरिष्ठांची कृपा दृष्टी राहील. नोकरीत पदोन्नतीची सुद्धा शक्यता आहे. व्यापार वृद्धीसाठी सुद्धा आपण विशेष प्रयत्नशील राहाल. ह्या महिन्यात खर्चाचे प्रमाण सुद्धा वाढेल. कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च होतील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चढ - उताराचा आहे. सुरवातीच्या दिवसात अभ्यासात लक्ष लागणार नाही. मात्र ह्या महिन्यात आपणास एखाद्या लेखनाची किंवा साहित्याची गोडी लागेल. ह्या महिन्यात आपणास संततीची काळजी वाटू लागेल. कुटुंबियांशी संबंध सामान्यच राहतील. एखाद्या नवीन मित्राचा सुखद सहवास लाभण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकाल. निद्रानाशामुळे प्रकृतीवर परिणाम होईल. थकवा जाणवल्याने कामात आपले मन लागणार नाही.


कन्या : ह्या महिन्यात आपण व्यावसायिक कामात व्यस्त राहाल. नोकरी करणाऱ्यांना महिन्याच्या अखेरीस लाभ होऊ शकेल. महिन्याच्या सुरवातीस व्यापारी वर्गास व नोकरी करणाऱ्या वर्गास काहीशा प्रतिकूल परिस्थितिस सामोरे जावे लागेल. व्यापारात नवीन संबंध जुळविण्यापूर्वी आपणास विशेष काळजी घ्यावी लागेल. व्यापाऱ्यांना अनावश्यक धावपळ करावी लागेल. महिन्याच्या दुसऱ्या पर्वात नोकरीतील व व्यापारातील दैनंदिन कार्यात मन रमणार नाही व त्या ऐवजी सहल व प्रवास ह्याकडे विशेष लक्ष लागेल. आर्थिक बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. कोणाला उसने पैसे दिले असल्यास त्याची वसुली करण्यास किंवा उसने पैसे फेडण्यास हा महिना चांगला आहे. ह्या महिन्यात नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. हा महिना विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. ह्या महिन्यात केलेल्या कष्टाचे पुढे जाता चांगला फायदा होईल. नाते संबंधात आपणास विशेष काळजी घ्यावी लागेल. ह्या महिन्यात रुचकर भोजनाचा आस्वाद घेता आल्याने आपण आनंदित व्हाल. मित्र व कुटुंबियांसह आपण चित्रपट बघण्यास, खरेदी करण्यास किंवा एखाद्या मेजवानीस जाऊ शकाल. महिन्याच्या अखेरीस वडीलधाऱ्या व्यक्तींकडून एखादी सुखद बातमी मिळू शकेल. संततीच्या प्रगतीने आपण खुश व्हाल. ह्या महिन्यात प्रकृतीची अधिक काळजी घ्यावी लागेल.


तुळ : हा महिना आपल्यासाठी अनुकूलतेचा आहे. ह्या महिन्यात आपण व्यापार व व्यवसायात उन्नती करण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक स्थिती सुद्धा अनुकूलच राहील. वसुलीचा पैसा मिळविण्यात सुद्धा आपण यशस्वी होऊ शकाल. आयात - निर्यातीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना विशेष लाभ होईल. दलाली, व्याज व कमिशन ह्यातून सुद्धा आपणास लाभ होऊ शकेल. भागीदारीत आपणास फायदा होईल. व्यावसायिक क्षेत्रात एखादा कायदाकीय त्रास होण्याची शक्यता आहे. ह्या महिन्यात आपण विरोधकांवर मात करू शकाल. ह्या महिन्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागू शकेल. संततीच्या प्रगतीमुळे आपण आनंदित व्हाल. कुटुंबीय व मित्रांसह महिना आनंदात घालवू शकाल. मात्र, नवीन संबंध जुळवताना काळजी घ्यावी. तसे पाहू गेल्यास एखाद्या खास मित्राशी आपले संबंध अधिक गाढ होण्याची शक्यता आहे. आपल्यामुळे इतरांचे काही नुकसान होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. अति भावनाशील झाल्याने आपल्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका.


वृश्चिक : हा महिना आपल्यासाठी अंशतः चांगला राहील. आर्थिक लाभ होतील. ह्या महिन्यात नवी मैत्री होईल, ज्यामुळे आपणास मोठा लाभ होईल. ह्या दरम्यान नोकरीत प्रगती होईल. व्यापार व व्यवसायात सुद्धा उन्नती होईल. एखाद्या बैठकीसाठी बाहेरगांवी जावे लागेल. यशस्वी होण्यासाठी आपणास आपली कामे वेळेवर करण्याची संवय लावून घ्यावी लागेल. ह्या महिन्यात उत्तम वाहनसौख्य सुद्धा लाभेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. त्यांची अभ्यासात प्रगती होऊ शकेल. ह्या महिन्यात स्त्री मित्रांसह बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरवू शकाल. समाजात मान - सन्मान व प्रसिद्धी मिळेल. कुटुंबात सुख - शांती व आनंदाचे वातावरण राहील. मात्र, संवाद साधताना आपणास रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या महिन्यात आपली प्रकृती नरम - गरम राहील. मनात नकारात्मक विचारांचे काहूर माजेल व त्याचा त्रास होईल.


धनु : हा महिना आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आपणास आध्यात्मिकतेची गोडी लागेल. ह्या महिन्यात आपल्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडतील, तर काही गोष्टीत त्रास होत असल्याचे जाणवेल. व्यावसायिक क्षेत्रात आपली उन्नती होईल, मात्र प्रतिस्पर्ध्यास डोके वर न काढून देण्याची काळजी आपणास घ्यावी लागेल. मनात नकारात्मक विचार आल्याने आपणास त्रास होईल व त्यामुळे आपल्या कामाचा वेग मंदावेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाराज होतील. व्यापारात आपणास नशिबाची साथ मिळत नसल्याचे जाणवेल. एखाद्या महत्वाच्या कार्यात सुद्धा निर्णायक स्थिती राहू शकणार नाही. अनावश्यक कामावर पैसा खर्च होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष द्यावे लागेल. ह्या महिन्यात वैवाहिक जोडीदाराशी आपले संबंध अधिक दृढ होतील. कोणत्याही परिस्थितीत आपणास वैवाहिक जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळेल. भावंडांशी सुद्धा संबंधात सौहार्दता टिकून राहील. मात्र, महिन्याच्या दुसऱ्या पर्वात कौटुंबिक वातावरण दूषित होईल. अशा परिस्थितीत आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे हितावह होईल. ह्या महिन्यात आपणास सर्दी, खोकला व अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.


मकर : हा महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपण येणाऱ्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यास आपले नुकसान होऊ शकते. मात्र, महिन्याच्या मध्यास संपत्ती व व्यापार - व्यवसायात आपणास फायदा होईल. एखादी नवीन योजना अंमलात आणू शकाल. विरोधकांशी बोलणी करण्यात यशस्वी होऊ शकाल. घरी पाहुण्यांची वर्दळ राहिल्याने खर्चात वाढ होईल. तसे पाहू गेल्यास शेअर्स बाजारातून आपणास लाभ प्राप्ती होऊ शकेल. ह्या महिन्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासात विशेष लक्ष लागणार नाही. भावंडांशी सौहार्दाचे संबंध राहतील. एखाद्या प्रिय मित्राचा सुखद सहवास लाभेल. कुटुंबियांसह बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरवू शकाल. ह्या महिन्यात आपली प्रकृती नरम - गरम राहील. थकवा आल्याने कामात मन रमणार नाही. महिन्याच्या अखेरीस घरातील वृद्ध व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने खर्चात वाढ होईल.


कुंभ : हा  महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या महिन्यात मनातील सर्व ईच्छा पूर्ण झाल्या तरी एखाद्या गोष्टीमुळे मन उदास होईल. ह्या दरम्यान नोकरी करणाऱ्या व्यक्तींना काही लाभ होतील. पदोन्नतीची सुद्धा शक्यता आहे. बदलीची संभावना आहे. व्यापार वृद्धीसाठी आपणास कर्ज काढण्याची गरज भासेल. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वादात न अडकण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. महिन्याच्या मध्यास आपणास नोकरीचा कंटाळा आल्याने ती सोडण्याचा विचार करीत बसाल. त्यामुळे आपण आपली उद्दीष्टे पूर्ण करू शकणार नाही. वरिष्ठांशी सुद्धा मतभेद संभवतात. दीर्घकालीन गुंतवणूक आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. हा महिना विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. ह्या महिन्यात आपणास संतती संबंधी एखादी काळजी वाटू लागेल. ह्या व्यतिरिक्त कौटुंबिक जीवन मात्र उत्तम असेल. आपण जर कुटुंबात वाढ करण्याचा विचार करत असाल तर तो गंभीरपणे करावा. ह्या महिन्यात सामाजिक कार्यासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. ह्या महिन्यात आपले आरोग्य उत्तम राहील.


मीन : हा महिना आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. ह्या महिन्यात एखादी विशिष्ट गोष्ट साध्य करण्यासाठी आपणास कठोर परिश्रम करावे लागतील. ध्येयपूर्ती करण्यात सुद्धा त्रास होण्याची शक्यता आहे. लोक आपल्या कामातील चुका काढण्याचा प्रयत्न करतील. ह्या महिन्यात आराम करण्याचा विचार सोडून द्यावा लागेल. ध्येयपूर्ती करण्याकडे लक्ष केंद्रित करून पुढील वाटचाल करावी लागेल. निष्क्रिय राहिल्यास आपण आळसावून जाण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दृष्ट्या नवीन काही करण्याचा विचार करू शकाल. आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी दीर्घ कालीन गुंतवणूक करू शकाल. ह्या महिन्यात विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करावा लागेल. कुटुंबातील वातावरण तणावग्रस्त होण्याची शक्यता आहे. अशा वेळी गप्प राहण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. व्यक्तिगत जीवनात सुद्धा चढ - उतार येतील. ह्या महिन्यात विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. आपण सामाजिक व धार्मिक कामात सहभागी होऊ शकाल. ह्या महिन्यात आपणास प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. महिन्याच्या दुसऱ्या पर्वात आपल्या अंगात आळस शिरेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या