व्यसन : एक वाईट सवय | Addiction


'व्यसन' म्हणजे संकट. परंतु प्राकृतात रुढार्थाने 'व्यसन' या शब्दाचा अर्थ एखादी 'वाईट सवय' असा घेतला जातो. दारू पिणे, जुगार खेळणे, अंमली पदार्थांचे सेवन करणे इत्यादी साऱ्या वाईट सवयी म्हणजे व्यसनेच होत. ह्या आणि अशा सर्व सवयी म्हणजे त्या व्यसनाधीन व्यक्तींच्या आरोग्यावरील व आयुष्यावरील थोर संकटच नव्हे काय ? इतकेच नव्हे तर व्यसनाधीनतेमुळे कौटुंबिक जीवनाची वाताहत होते, कुटुंबियांच्या हालअपेष्टांना पारावर उरत नाही, मुलाबाळांची आबाळ होते, त्यांच्या शिक्षणावर दुष्परिणाम होतो, त्यांची स्वप्ने उद्ध्वस्त होतात. व्यसनाधीन व्यक्तीचे शरीर अनेक व्याधींनी पोखरले जाते. मानसन्मानाचा बोजवारा उडतो, प्रतिष्ठा साफ धुळीस मिळते. आप्तेष्टसुद्धा हळूहळू त्यांना टाकू लागतात. थोडक्यात कोणतेही व्यसन म्हणजे खरोखरच घोर संकटच होय ! ही व्यसने साथीच्या रोगांप्रमाणे असतात बरं का ? ती एका व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाहीत, ही गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला हवी. व्यसने एकाएका व्यक्तीला प्रभावित करून संपूर्ण समाजालाच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राला ग्रासतात आणि राष्ट्रीय संकटाचे स्वरुप धारण करतात.
     उपरोक्त व्यसनांचे आपल्या देशातून समुळ उच्चाटन झाले आहे असे ठामपणे सांगता येईल का ? तसे नक्कीच सांगता येणार नाही ! त्यात भरीस भर म्हणून नवनवीन व्यसने नव्या पिढीचा घास घेत आहेत. सध्या मोबाईलवर वेगवेगळे गेम्स उपलब्ध करून दिले जात आहेत. 'ब्लूव्हेल्स ', पोकेमॉन गो यासारख्या गेम्स ने अनेक तरुणांचे बळी घेतले आहेत, हे सत्य आपण जाणताच ! आता अगदी शाळकरी मुलांपासून तरुणांपर्यंत असंख्य मुले पब्जी नावाच्या गेम ची शिकार होत आहेत. दिवस-रात्र मोबाईलवर हा गेम खेळण्याच्या वेडापायी खाणे, पिणे, शाळा-कॉलेज, अभ्यास, स्वतःची प्रकृती यापैकी कशाचीही त्यांना तमा नसते व भानही नसतो. आपल्या दृष्टीवर, मानसिक संतुलनावर, अभ्यासावर या नव्या व्यसनाचा नव्या संकटाचा किती विपरीत परिणाम होत आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षातच येत नाही, ही फार मोठी चिंतेची बाब आहे. सरकार कशाकशावर बंदी आणणार ? बरे, कायदेशीर बंदी आणून 'बंदी' ज्यावर आणण्यात आली ती गोष्ट कायमस्वरूपी बंद झाली असे म्हणण्याचे धाडस करता येईल का ? उलटपक्षी एका बाजूने चांगल्या हेतूने एखाद्या गोष्टीवर बंदी घालावी, तर दुसर्‍या बाजूला भ्रष्टाचार बोकाळतो अशी स्थिती आहे. त्यामुळे एकटे सरकार व्यसनाधिनतेवर, कायदे करून मात करू शकणार नाही; हे सत्य स्वीकारण्याशिवाय अन्य पर्यायच नाही. मग या व्यसनाधिनतेवर काही उपायच नाही का ? समाजाला पोखरणाऱ्या, राष्ट्राला हतवीर्य करणाऱ्या या व्यसनाधीनतेला समुळ नष्ट करण्याची क्षमता फक्त अध्यात्मिक साधंनेतच आहे. आता आध्यात्मिक साधना म्हटली म्हणजे थेट मानवी मनाचा संबंध येतो. याचा अर्थ असा की, मानवी मनाचे अध्यात्मिक समुदेशन करून त्याची चंचलता दूर करणे क्रमप्राप्त असते. असे अध्यात्मिक समुपदेशन करण्याची क्षमता फक्त आणि फक्त श्री सद्गुरू मध्येच असते. अध्यात्मिक साधने मुले विवेकी बनलेले अंतर्मन अशा प्रलोभनांना अपसारित करते. भगवंताच्या नामाचा जप समस्त व्यसनांना मानवाच्या मनातून हद्दपार करतात. यासाठीच प्रत्येक प्रकारच्या आणि कारक व हानिकारक व्यसनांना आपल्या दिशेने येण्यापासून रोखण्यासाठी चांगल्या विचारांची सवल घालने स्वत:च्या हिताचे निर्णय आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या